हरवलेल्या पक्षाला घरट्यापर्यंत पोहचवलं 😢 ●

हरवलेल्या पक्षाला घरट्यापर्यंत पोहचवलं 😢



माझ्या मागे बसलेली आज्जी कोण आहे हे मला नाही माहीत, दोन दिवसांपूर्वी मी आजी आजोबांना भेटण्यासाठी गावी गेलेलो आणी आज मी माझा काही महत्वाच्या कामा निमित्ताने लातूर साठी परत यावं लागलं, आशा या परिस्थितीत घराच्या बाहेर निघणं हे खूप चुकीचं आहे हे मी मान्य देखील करतोय, पण काय देवाने याच आज्जी साठी तर मला घरा बाहेर पाठवले नसेल  ?


दुपारी 1 वाजता माझा आजी आजोबांना भेटून घराबाहेर निघालेलो, अंदाजे सुमारास 2 वाजेपर्यंत मुरुड मध्ये पोहचलो, कानात हेडफोन मध्ये गाणी चालू होती, मान डोलवत सावकाश गाडी चालवत होतो, मुरुड पासून सुमारे अडीच ते तीन अंतरावर (करकट्टा पाटी) च्या इथे एक म्हातारी बाई कंबरेतुन वाकत रस्त्याच्या कडेने हळूहळू चालत असलेली अचानक दिसली, डोळ्याला तिच्या चष्मा, हातात एक फाटकी पिशवी, क्षणार्धात गाडी मी बाजूला उभी केली, आणी विचारलं, आजी इकडं कुठे, आजी ने अलगद मान वर केली, तिचे डोळे पाण्याने डबडबले होते, म्हणलं आजी काय झालं, काहीतरी विचित्र च घडलेले असणार ही खात्री मला लगेच झाली, आजी रडायला लागली, म्हणलं आज्जी रडू नका, काय झालं आहे मला व्यवस्थित सांगा, तुरळक काही येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या आमच्या कडे पाहत होत्या, आजी काहीच बोलेना झाली, क्षणभर मीच गुपचूप बसलो, आजीनं तिचा हात समोर केला न मी तो हात माझा हातात घेतला, बिचारीचा हात थरथरत होता, माझा मनात खूप कालवा कालव झाली, आजी ला थोडासा धीर आला अन मग आजीने जे काही झालं ते सांगायला सुरुवात केली,


चार दिसाआदी नाती कड गेलती मी मुरडा ला , म्हणजे मुरुड ला ( काही तरी लेकराच बारसं होत असे म्हणे ) आज सकाळी पाहुण्यांनी घरा बाहीर लोटलं , काय तरी कायनू की कसला तरी रोग आला मन कुटन तरी, ( कोरोना व्हायरस ) म्हणून घरा बाहिर काढलं , मग सकाळी 10 वाजल्यासण मी उटं बस करीस्तोर इथवर आली, मोप गाड्या वल्याली हात केला पण कुणी नाही उभा केली गाडी, म्हणून मी निघालते मपल्या घराकडं, तुमी लैच देवा सारक आलाव


अतिशय राग आलेला मला, दुःख ही वाटलं, वेदनाही होत होत्या, मन भरून आलेलं, त्या आज्जी ला घट्ट मिठी मारावी अस वाटलं,
आजी ला मी म्हणलं घर कूट आहे तुमचं आजी, आजी म्हणाली लातुरात ,
म्हणलं लातुरात कुठं असेल बर आता यांचं घर, मी पुढचा काही विचार न करता आजीला म्हणलं, आजी तुम्ही पाहिलं गाडीवर बसा, आजी च्या चेहऱ्यावर आता एक वेगळंच समाधान दिसत होतं, तेवढ्यात तिथे एक अनोळखी इसम आला आणी आजीला गाडीवर बसवण्यास मदत केली न शेवटी न राहून मीच म्हणलं, दादा आमचा एक फोटो घ्या ओ माझ्या मोबाईल मध्ये, कंबरेला मिठी मारून गच पकडून आजी गाडीवर बसली आणी माझी गाडी लातूर च्या दिशेने चालू झाली,  जसा मी गाडी चालवू लागलो तशी आजी न तिची मान माझा पाठीवर टाकली, क्षणभरासाठी मी जरा घाबरलो च, मी आवाज दिला, आजी बरे आहेत न, आजी न प्रतिसाद दिला आणी निश्वास सुटला एकदाच, लातूर पर्यंत जाई पर्यंत आजी ला मी एक ही शब्द नाही बोललो, अर्धा पाऊण तासात लातूर येथील 5 नंबर चौक आला आणी आजी ने मला गाडी उभी करण्यास सांगितले, म्हणलं आजी इथे कुठे उतरत आहेत, आजी म्हणाल्या " धाकल हरंगूळ " माझं हाव हाय, जाती की मी आता इथून, म्हणलं आजी आता गाड्या बंद आहेत मी तुम्हाला तुमच्या घरा कडे घेऊन जातो, पण आजी ऐकायला तयार नव्हती, आजी गडावरून अलगद खाली उतरली, आणी कमरेची दहाची नोट माझा समोर केली, आता मी शब्दात नाही सांगू शकत की त्या वेळी माझा मनात काय वेदना झाल्या असतील, आजी ला म्हणलं नको मला हे पैसे, तर आजी रडायला लागली , म्हणलं आजी नका रडू, आणी मी पटकन माझा खिशातील पाचशे रुपये च्या 2 नोटा काढून आजी ला दिल्या, तिच्या 10 रुपयेच्या नोटे पुढे मी दिलेले हजार हे शून्य च रुपये होते ,आजी पैसे घ्यायला काही च तयार च होईना, शेवटी मी आजी ला म्हणलं, तुम्ही मला मला मगाशी देव माणूस म्हणालात न तर अस समजा की तो देव च तुम्हाला मदत करत आहे, अस देवाने दिलेल्या पैशाना नाही म्हणू नका, कसेबसे काहीतरी बोलून शेवटी आजीच्या हातात ते पैसे दिले, आणी आजी मला एक ही शब्दाने काही न बोलता चालायला लागल्या,


आत्ता सध्या माझा मनात फक्त आणी फक्त प्रश्नच प्रश्न निर्माण झाले आहेत, आजी ला मी विचारलं होत त्यांचं नाव, त्यांच्या मुलांची नावे, चेऱ्यावरून तर कळलं होतं की त्यांचे पती स्वर्गीय झालेले आहेत, त्यांचं घर विचारलं, बऱ्याच गोष्टी विचारून देखील त्यांनी मला काहीच का बरं सांगितलं नसेल, काय कारणे असतील त्या मागे, घरा पर्यंत गाडीवर सोडण्यास मी इतका फोर्स करून देखील त्यांनी चालत जाण्यास च का तयार झाल्या असतील, प्रश्नाचं काहून हे पुढेही चालत च राहील,


आज एक सत्तरी ओलांडलेल्या म्हातारी कडून खूप काही शिकायला मिळालं आहे, तिचा सोबत घडलेला हा प्रसंग खूप काही शिकाउं गेला आहे, काय माहीत कोण होती ती बिचारी,


आज मनात अनेक प्रश्न उभे आहेत, आपण आयुष्यात काय कामावल आहे, आणी आपल्याला शेवटी घेऊन काय जायचं आहे 🙏


:- जय भोसले